| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
नेक्स्टजेन डिजिटलचे संस्थापक श्रीकांत एल. जाधव व अलोरवेदाच्या संस्थापक-भागीदार पूजा त्रियुग खेडेकर यांना प्रतिष्ठेचा एमएसएमई स्टार पुरस्कार 2026 खा. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय व्यावसायिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड आणि झेप उद्योगिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉलमध्ये मंगळवारी (दि. 23) आंतरराष्ट्रीय एसएमई दिनानिमित्त हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून केवळ या दोनच उद्योजकांनी या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
या पुरस्काराचे मानकरी ठरलेले श्रीकांत एल. जाधव हे ‘नेक्स्टजेन डिजिटल’ या कल्पक, एआय-पॉवर्ड डिजिटल मार्केटिंग एजन्सीचे संस्थापक आणि डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी एआय-आधारित जाहिरात व्हिडिओ, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि आधुनिक ब्रँडिंगच्या माध्यमातून ई-कॉमर्स, रिअल इस्टेट व स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील व्यवसायांना प्रगतीचे नवे मार्ग दाखवले आहेत. दुसरीकडे, पूजा त्रियुग खेडेकर आणि सुप्रिया स्वप्नील स्वामी यांच्या ‘अलोरवेदा’ या ब्रँडने प्राचीन आयुर्वेदिक वनस्पतींचे ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम घडवून सुरक्षित, रसायनमुक्त व इको-फ्रेंडली हर्बल वैयक्तिक काळजीची उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उत्पादक व ई-कॉमर्स क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावरील गौरव करण्यात आला आहे.







