| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याने हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारींचा प्रभावी तांत्रिक तपास करून तब्बल 5 लाख 39 हजार रुपये किमतीचे 13 मोबाईल हस्तगत करत ते संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक बल्लाळ यांनी पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत विविध ठिकाणांहून हरवलेले मोबाईल शोधून काढले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. परत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश असून, एकूण 13 मोबाईलची अंदाजे किंमत 5.39 लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यावर विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि पोर्टलवर देखील नोंदणी करावी. त्यामुळे हरवलेला मोबाईल शोधण्यास आणि परत मिळवून देण्यास मोठी मदत होते, असे सांगितले.







