नेरळ | प्रतिनिधी |
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर माथेरान नगरपरिषद अलर्ट झाली आहे. पालिकेने येणार्या सर्व पर्यटकांचे स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली असून तीन परदेशी पर्यटकांना शहरात प्रवेश न देता माघारी पाठवण्यात आले आहे.
दस्तुरी नाका येथील या स्क्रिनिंग कार्यपद्धतीमध्ये माथेरान पालिकेच्या पथकाला तीन पर्यटकांना माथेरान शहरात प्रवेश देता आला नाही. रविवारी 5 डिसेंबर रोजी माथेरानच्या दस्तुरी नाका येथे मुंबई येथून प्रवासी कारने तीन परदेशी पर्यटक आले.त्याच्याकडून पालिकेच्या आरोग्य पथकाने रायगड जिल्हाधिकारी यांच्या गाईडलाईन नुसार मागील दोन दिवसातील कोविड 19 बाबतीतील आरटीपीसीआर टेस्ट केली असल्याबाबत टेस्टचा अहवाल मागण्यात आला.मात्र 2 डिसेंबरला रोजी जपानमधून मुंबई विमानतळावर पोहचलेल्या त्या तीन जपानी पर्यटकांकडे दोन दिवसांपूर्वीचा किंवा त्याआधीचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल नव्हता.मुंबईत तीन दिवस राहून हे पर्यटक माथेरान येथे आले होते. या पर्यटकांना माथेरान पालिकेच्या आरोग्य पथकाने महाराष्ट्र शासन आणि रायगड जिल्हाधिकारी यांची ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आलेली नियमावली याची माहिती करून दिली तसेच शासन आदेश देखील दाखवला.या तिन्ही जपानी पर्यटकांचे लसीकरण झाले होते आणि त्यांच्या मध्ये कोरोना संबंधी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नव्हती.तरीदेखील आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल त्यांच्याकडे नसल्याने आम्ही त्या पर्यटकांना शहराची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन शहरात प्रवेश दिला नाही अशी माहिती माथेरान पालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि पालिका मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी दिली आहे.
त्याचवेळी शासनाचे नवीन आदेश येईपर्यंत माथेरान मध्ये येणार्या प्रत्येक पर्यटकांचे स्क्रिनिंग केले जाईल अशी माहिती मुख्याधिकारी भणगे यांनी दिली.माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथे अलर्ट असलेल्या माथेरान पालिकेच्या पथकामुळे माथेरान मध्ये परदेशातून आलेले तीन पर्यटक प्रवेश करू शकले नाहीत.