22 पदकांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
21 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा2026 मध्ये रायगड पोलीस दलाने दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विविध स्पर्धात्मक विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत रायगड पोलिसांनी 9 सुवर्ण, 6 रजत आणि 7 कांस्य अशी एकूण 22 पदके मिळवत पदकतालिकेत अव्वल स्थान मिळविले. या मेळाव्यात रायगड पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी सहा विविध स्पर्धात्मक विषयांमध्ये सहभाग घेत आपल्या ज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक क्षमतेचा ठसा उमटविला. उत्कृष्ट संघभावना, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर रायगड पोलिसांनी हे यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची आणि व्यावसायिक तयारीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.







