नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून पनवेल परिसरात जोरदार पुनरागमन केले. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी, नदीकाठावरील कोळीवाडा परिसरात पुन्हा पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे अनेक घरांच्या अंगणात आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. दरवर्षी पावसाळ्यात सखल भाग असल्याने कोळीवाडा परिसराला पुराचा फटका बसत असून, यंदा ही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यकपणे नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







