। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरातील सेवादळ आळी येथील स्वामी हेरिटेज अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर एका सदनिकेत बुधवारी (दि. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सदर घटना भर लोक वसाहतीत घडल्याने रहिवाशी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच मदत कार्यासाठी अग्निशमक दल व वाहन समवेत माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके नगरपालिका टीम, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे वित्तहानी झाली असून, सुदैवाने जिवितहानी टळली आहे. या आगीचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, या भागात नेहमीच कमी जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांची विद्युत उपकरणे नेहमीच निकामी होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी वर्गातून होत आहे.







