वर्ष पूर्ण होत आले तरी शौचालयाचे काम अपूर्ण; अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
| तळा | प्रतिनिधी |
तळा बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयाचे काम सुरू होऊन वर्ष पूर्ण होत आले, तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बसस्थानकात ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत असून, शौचालयाअभावी प्रवाशांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे.
शौचालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कामाची संथ गती आणि दर्जाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे बांधकाम अद्याप अपूर्णच आहे. वर्षभराचा कालावधी उलटत आला तरी प्रवाशांना शौचालयाची सुविधा मिळालेली नाही. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत संबंधित कंत्राटदाराला जाब विचारण्याची तसदी तालुक्यातील लोकप्रतिनिधी अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संबंधित विभाग व कंत्राटदारही निवांत असल्याची नाराजी प्रवाशांमध्ये आहे. ‘लवकरच काम पूर्ण होईल’ अशी आश्वासने वारंवार दिली जात असली तरी प्रत्यक्षात कामाची स्थिती जैसे थेच आहे.
बसस्थानक हे प्रवाशांच्या दैनंदिन वापराचे महत्त्वाचे ठिकाण असताना मूलभूत शौचालयाची सुविधा वर्षभरापासून अपूर्ण राहणे ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि प्रवाशांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.







