जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची 3 सुवर्णांसह 20 पदकांची कमाई
| पुणे | प्रतिनिधी |
दक्षिण कोरियातील मुजू येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसीई) तसेच इंचॉन येथे आयोजित वर्ल्ड ऑलिम्पिक तायक्वांदो फेडरेशन यांच्या स्पर्धांमध्ये पुण्यातील आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन आणि सेंट फेलिक्स स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा गौरव वाढविला. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मिळून 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 20 पदके जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
मुजू येथे झालेल्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिपमध्ये पूमसे आणि क्योरोगी प्रकारात खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. मंथन देवी आणि कृती दवे यांनी प्रत्येकी 1 सुवर्ण व 1 रौप्य पदकाची कमाई केली. आरवी गवारे हिने 2 कांस्य पदके जिंकली, तर कल्याणी डफळ हिने 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक पटकाविले. प्रांजल पानसे हिने 1 रौप्य व 1 कांस्य पदक मिळवत संघाच्या यशात मोलाची भर घातली. या स्पर्धेत संघाने एकूण 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली.
यानंतर इंचॉन येथे झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक तायक्वांदो फेडरेशनच्या स्पर्धेतही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी कायम राखली. पूमसे आणि क्योरोगी प्रकारात मंथन देवी याने 2 रौप्य पदके जिंकली. कृती दवे, आरवी गवारे, कल्याणी डफळ आणि प्रांजल पानसे यांनी प्रत्येकी 1 रौप्य व 1 कांस्य पदक मिळवत संघाच्या पदकसंख्येत भर घातली. या स्पर्धेत संघाने 6 रौप्य आणि 5 कांस्य पदके पटकाविली.







