महाड नगरपरिषदेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
| महाड | प्रतिनिधी |
महाड नगर परिषदेने गांधारी ब्रिज ते केभुर्ली हद्दीपर्यंत (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या) बनवण्यात आलेल्या दोन कोटींच्या रस्त्याला एक महिन्यातच तडे गेले. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना नगर परिषदेचे बांधकाम विभाग मात्र नरोवा कुंजोराची भूमिका अवलंबत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
महाड नगरपरिषदेने गांधारी नदी ते केबुर्ली गावाच्या हद्दीपर्यंत 600 मीटर रस्ता सिमेंट काँक्रिटमधून बनवण्याचे धोरण अवलंबिले. यासाठी तब्बल 2 कोटी 20 लाख 21 हजार 450 रुपयांचे काम सुनील कन्स्ट्रक्शन कंपनीला दि.8 मे 2026 रोजी या कामाची प्रशासकीय मंजुरी देऊन या कामाची मुदत 365 दिवस ठेवली. मात्र, सदरचे काम मूळ एजन्सीने पोट ठेकेदाराला दिल्याने ठेकेदाराने एक महिन्यामध्ये 600 मीटर लांबी पैकी 25 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण केला.
महाड नगर परिषदेने गांधारी पूल ते केभुर्ली गावाच्या हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. मात्र, काम चालू होऊन एक महिन्यातच पावसाळा चालू झाल्याने संबंधित एजन्सीनेचे काम करणाऱ्या पोट ठेकेदाराने 600 मीटरपैकी अर्धे काम पूर्ण केले. मात्र, एक महिन्यातच या कामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. अखेर या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता राहील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून सावित्री नदी पात्रातून काढणाऱ्या गाळाचे डंपर व रेतीच्या अवजड वाहतुकीच्या गाड्या गेल्यास रस्ता पूर्णपणे खचून दोन कोटी रुपये नगर परिषदेचे सावित्रीच्या नदीच्या पाण्यात जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकंदरीत, या रस्त्याला गेलेल्या तड्यांबाबत महाड नगरपालिकेत आता कोणती भूमिका घेणार याकडे महाडकर जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत महाड नगर परिषदेचे बांधकाम अभियंता प्रवीण कदम यांच्याशी विचारणा केली असता संबंधित कामाच्या ठिकाणी मी माझ्या सहकाऱ्यांसह जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून येतो, असे सांगितले.
पोट ठेकेदाराकडूनच कामाचे वाटोळे?
ज्या पोट ठेकेदाराला संबंधित एजन्सीकडून काम देण्यात आले, त्याने यापूर्वीदेखील महाड एसटी बस स्टॅन्ड ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याच्या कामाचेही वाटोळे केले आहे. त्याच पद्धतीने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून खर्डी नगर भुवन नेवाळेवाडी या रस्त्याचेदेखील वाटोळे केले आहे. हा वाटोळे करणारा ठेकेदार असून, यावर राज्यकर्ते फिदा असल्याने जनतेचे पैसे कसे वाया जातात याचे उत्तम उदाहरण महाडमधील गांधारी ब्रिज ते केभुर्ली गावाच्या आधीपर्यंत चाललेल्या नव्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला पडलेल्या भेगांवरून पाहण्यास मिळत आहे.





