| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातून कचरा टाकणे बंद झाले असले, तरी जुन्या डम्पिंग ग्राऊंडवरील वर्षानुवर्षे साचलेला कचरा अद्यापही तसाच पडून आहे. त्यामुळे या ठिकाणाहून दुर्गंधी पसरत असून डास, माशा आणि विविध जंतूंचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तळा नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार शहरातील आंबेळी येथे नवीन ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवीन डम्पिंगची व्यवस्था झाली असली तरी जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अद्याप कायम आहे. जुन्या डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक, ओला कचरा तसेच वैद्यकीय कचरा एकत्रितपणे अनेक वर्षांपासून साचून राहिला आहे. पावसाळ्यात या कचऱ्यावर पाणी पडून त्यातून निर्माण होणारे दूषित द्रव जमिनीत मुरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूजल दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर पुढे तहसील कार्यालय असल्याने तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. दुर्गंधीमुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमांकडे दुर्लक्ष?
स्वच्छ भारत अभियान तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार जुन्या कचरा साठवणूक स्थळाचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, तळा शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडची स्थिती पाहता या नियमांच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने जुना कचरा तातडीने हटवून बायोमायनिंग किंवा शास्त्रोक्त कचरा प्रक्रियेच्या माध्यमातून डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करावे, अशी मागणी तळा शहरवासीयांकडून होत आहे.
तळा शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्यासाठी स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळा संपल्यानंतर तातडीने कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
राकेश पाटील,
स्वच्छता निरीक्षक, तळा नगरपंचायत





