गोगावलेंचा दावा; रायगडच्या पालकमंत्रिपदाचा फैसला होणार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना केलेल्या मदतीच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून रायगडच्या पालकमंत्रिपदावरील दावा सोडला जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू होती. त्यातच आता मंत्री भरत गोगावले यांच्या ताज्या वक्तव्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अधिकृत निर्णय होण्याआधीच मीच पालकमंत्री असा दावा केल्याने गोगावलेंना नेमका कोणता हिरवा कंदील मिळाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
आजच तिढा संपणार असून, संध्याकाळपर्यंत माझ्या नावाची घोषणा होईल, असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर यंदाच्या 15 ऑगस्टला रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नात्याने आपणच ध्वजवंदन करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गोगावलेंच्या या दाव्यानंतरही राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही. तटकरे आपला शब्द पाळणार की पुन्हा गोगावलेंच्या दाव्याला सुरुंग लागणार, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत पालकमंत्रिपदाचा तिढा खरोखरच सुटला, असे म्हणणे घाईचे ठरणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन जवळपास पावणेदोन वर्षे उलटली, तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न बराच काळ प्रलंबित राहिला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यातील राजकीय रस्सीखेच चर्चेत राहिली. महायुतीतील अंतर्गत समीकरणांमुळे या पदाचा निर्णय लांबणीवर पडल्याचे बोलले जात होते.
आता मात्र गोगावलेंनीच तिढा संपला असा दावा केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा सौदाफ नेमका कुणाच्या बाजूने झाला आणि 15 ऑगस्टला रायगडच्या ध्वजवंदनाचा मान कुणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी गोगावलेंच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे हे काहीच वेळात समजेल. तसेच जर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला असेल तर नाशिकच्याही पालकमंत्रिपदाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
आजच होणार घोषणा; गोगावलेंना आत्मविश्वास
रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आज होणार असून आपलं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये त्यावर चर्चा झाली आहे. त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत आपल्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा केली जाणार आहे. यंदाच्या 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान आपल्यालाच मिळणार असून पालकमंत्री म्हणूनच आपण ध्वजारोहण करणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला.
…अखेर वाद मिटला?
महायुती म्हणून राज्याच्या सत्तेत एकत्रित असले तरीही रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांचा वाद हा नेहमीचाच मुद्दा या ठिकाणच्या राजकारणात आहे. सुनील तटकरे यांनी आपली कन्या, आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली. त्याचवेळी शिवसेनेच्या जिल्ह्यातील तीनही आमदारांनी हे पद आपल्याकडेच राहावं यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या सगळ्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकारण प्रत्येक टप्प्यावर वेगळं वळण घेत आहे.
अनिकेत तटकरेंना आमदारकी
दोन महिन्यांपूर्वी राज्यातील विधान परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये सुनील तटकरे यांचं सुपुत्र अनिकेत तटकरे हे आमदार झाले. मात्र त्या आधी ही जागा आपल्यालाच मिळावी, आपलेच मतदार सर्वाधिक असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. मात्र वरिष्ठ स्तरावर झालेल्या तडजोडीअंती, शिवसेनेने माघार घेत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा केला. मात्र, या आमदारकीच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी तटकरे यांनी तडजोड केल्याची चर्चा त्यावेळी होती.







