नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास; स्थानिक रहिवासी, वाहनचालक त्रस्त
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील उरण चारफाटा, द्रोणागिरी नोड, चिरनेर, कलबुसरे आणि दिघोडे आदी ठिकाणी सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर आठवडा बाजारांचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही अधिकृत परवानगी आहे का, याची पर्वा न करता शासकीय मालमत्तेवर खुलेआम दुकाने थाटली जात असताना संबंधित प्रशासन मात्र, मूग गिळून गप्प का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
आठवडा बाजाराच्या दिवशी प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होते. दुकानांचे स्टॉल रस्त्याच्याकडेला तसेच वाहतुकीच्या मार्गात येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवा अडकल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडू शकते. अनर्थ घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. बाजार संपल्यानंतर परिसरात कचऱ्याचे ढिगारे, प्लास्टिक, सडलेला भाजीपाला आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते.
स्वच्छतेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे साथीच्या आजारांचा धोका असताना दुसरीकडे अशा पद्धतीने कचरा आणि अस्वच्छतेला मोकळे रान दिले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बाजारांमुळे स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहे. पदपथांवर अतिक्रमण, रस्त्यालगत बेकायदेशीर दुकाने, वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचा रोजचा त्रास
वाढत चालला आहे.
कारवाईची मागणी
आता कारवाईची वेळ आली आहे; अन्यथा नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही. हे बेकायदेशीर आठवडा बाजार तातडीने बंद करून सिडकोची जमीन अतिक्रमणमुक्त केली नाही, तर सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.







