| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल शहरातील श्रेयस हॉस्पिटललगतच्या झोपडपट्टीत गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना नवी मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून सुमारे 600 ग्रॅम गांजा जप्त केला असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना श्रेयस हॉस्पिटललगतच्या झोपडपट्टीतून गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी पथकाने परिसरावर लक्ष ठेवून कारवाईची तयारी केली. मंगळवारी सापळा रचून गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर झोपडपट्टीतील एका घराची झडती घेतली असता तेथे सुमारे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गांजाच्या विक्रीच्या या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.







