। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गाव येथे वन विभागाच्या मालकीची जमीन स्वतःची असल्याचे भासवून खाजगी व्यक्तीला विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपटा गावातील सर्व्हे क्रमांक 41 ब, क्षेत्र 1.30 हेक्टर ही जमीन वन विभागाच्या अभिलेखानुसार महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) कायद्यानुसार शासनाच्या मालकीची आहे. मात्र, गंगाधर नारायण बिवलकर व यशवंत नारायण बिवलकर रा. पुणे यांनी सदर जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून तसेच ती विक्री करण्याचा अधिकार असल्याचे भासवून एका खाजगी व्यक्तीला विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे वन विभागाची तसेच शासनाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने वनरक्षक भाऊसाहेब रतन जवरे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गंगाधर नारायण बिवलकर व यशवंत नारायण बिवलकर यांच्याविरुद्ध फसवणुकी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







