। कळंबोली | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग 747 एफ हे मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग 747 मालवाहू विमान ठरले आहे.
नॅशनल एअरलाइन्सच्या या ऐतिहासिक बोईंग 747 मालवाहू विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलतोफांच्या सलामीने उत्साहात स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक घेऊन आलेल्या या दिग्गज विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे.
नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात सध्या नऊ बोईंग 747 मालवाहू विमाने असून, मोठ्या प्रमाणातील मालाची वाहतूक, मानवतावादी मदत तसेच विशेष प्रकारच्या मालवाहतूक सेवांसाठी या विमानांचा वापर केला जातो. बोईंग 747सारख्या महाकाय मालवाहू विमानाचे आगमन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणून वाढणारी क्षमता आणि महत्त्व अधोरेखित करणारे ठरले आहे.
नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार होत असल्याने आगामी काळात विविध देशांमधून मोठ्या प्रमाणावर मालवाहू विमानांची ये-जा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि परिसरातील उद्योग, व्यापार तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्राला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.






