नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
| नवी मुंबई । वार्ताहर ।
पामबीच रोडवरील नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या देखभालीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सेल्फी पॉईंटसह जॉगिंग ट्रॅकवरील विद्युत पुरवठा बंद झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळमधील होल्डिंग पाँडचे सुशोभिकरण करून त्याला ज्वेल्स ऑफ नवी मुंबई असे नाव दिले आहे. याठिकाणी सकाळी व सायंकाळी जवळपास पाच हजारापेक्षा जास्त नागरीक जॉगिंगसाठी येत असतात. शहरातील सर्वाधिक गर्दी असणार्या उद्यानांमध्ये या परिसराचा समावेश होतो. महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर मोहन डगावरक असताना या परिसराच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जात होते. परंतु सद्यस्थितीमध्ये योग्य पद्धतीने देखभाल करण्यात येत नाही. जवळपास 50 टक्के पथदिवे बंद आहेत. पहाटे सहापासून येथे जॉगिंगसाठी नागरीक येत असतात. अंधार असल्यामुळे सर्वांची गैरसोय होत आहे. खाडिकिनारी असल्यामुळे येथे सापांचा वावर जास्त आहे. अंधार असल्यामुळे सर्पदंश होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या सुरूवातीला महानगरपालिकेने आय लव्ह नवी मुंबई असा उल्लेख असणारा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. या सेल्फी पॉईंटची अर्धी वीज गायब झाली आहे. यामुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात विजेची समस्या सोडविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांनी दिल्या आहेत. विद्युतविषयी देखभालीकडे नियमित लक्ष देण्यात येणार आहे. – शिरीष आरदवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महानगरपालिका.