| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सोशल मीडियावरील इंस्टाग्राम व युट्युबवर केरला गव्हर्मेंट लॉटरी आणि श्री स्वामी समर्थ फायनान्स या नावाने अनेक जाहिराती दिसत असतात. स्वामी समर्थ फायनान्सच्या जाहिरातीवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, हे सर्व क्रमांक परराज्यातील ठगांचे असल्याचे निदर्शनास येते. तसेच, या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर समोरील ठगांकडून प्रथम “2 हजार 200 रुपये प्रोसेसिंग चार्ज द्यावे लागतील. त्यानंतर आपले कर्ज मंजुर करण्यात येईल,” असे सांगितले जाते. अनेक जण आपल्याला कर्ज मिळेल या आशेवरती त्यांनी दिलेल्या स्कॅनरवर किंवा क्रमांकावर ऑनलाईन पैसे पाठवत असल्याने अनेकांची फसवणूक होत असते. तसेच, केरला गव्हर्मेंट लॉटरी नावाने देखील इन्स्टाग्राम व युट्युबवर अनेक जाहिराती दाखवण्यात येतात. काही ठिकाणी लॉटरीचे एक तिकीट 40 रुपयांचे असते. तर, काही ठिकाणी हेच तिकीट 149 रुपयांचे असते. तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला लॉटरीच्या तिकिटाचे अनेक क्रमांक व्हाट्सॲपवर पाठवले जातात. त्यानंतर आपण आपल्या निवडीचा क्रमांक निवडल्यानंतर ऑनलाईन पैसे भरून तिकीट बुक केले जाते. या लॉटरीमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 25 कोटी रुपये, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 12 कोटी रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस 75 लाख रुपये असे सांगण्यात येते. याशिवाय 10 लाखांपासून 2 लाखांपर्यंत देखील अनेक बक्षीस असल्याचे सांगण्यात येते. तिकीट बुक केल्यानंतर दुपारी 3.00 वाजता ऑनलाईन ड्रॉ पाठवण्यात येतो. त्यात आपल्याला 5 लाखाचे किंवा 12 लाखाचे एखादे तिकीट लागले असल्याचा क्रमांक पाहायला मिळतो. हा क्रमांक समोरच्या व्यक्तीला कळवल्यानंतर त्याच्याकडून जीएसटीसाठी पैसे पाठवण्याबाबत सांगितले जाते. या ठिकाणी देखील ऑनलाईन फ्रॉड होण्याचाच प्रकार असल्याचे निष्पन्न होत आहे.







