| आगरदांडा | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या डिजिटल प्रणालीची दि.25 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे खताची उपलब्धता, मागणी, बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोबाईलवरून अनुदानित खतासाठी मागणी नोंदविता येणार आहे. तसेच, आपल्या पसंतीचे अधिकृत खत विक्री केंद्र निवडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्याची मागणी मंजूर झाल्यानंतर त्याला विशिष्ट कोड उपलब्ध होणार असून, हा कोड संबंधित अधिकृत विक्री केंद्रावर दाखवून खताची खरेदी करता येणार आहे. या प्रणालीबाबत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामसभा तसेच गाव बैठकीमध्ये शेतकऱ्यांना माहिती देऊन प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत आहे. दरम्यान, मुरुड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, अनुदानित खताची खरेदी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, असे आवाहन मुरूड-जंजिरा तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे यांनी कृषी विभागाच्यावतीने केले आहे.







