| रसायनी | प्रतिनिधी |
पाताळगंगा-रसायनी औद्योगिक परिसरातील जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नदीत रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची तातडीने सखोल चौकशी करून दोषी आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष राकेश खराडे यांनी केली आहे.
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर रसायनी पाताळगंगा परिसरातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बॉम्बे डाईग प्रायव्हेट लिमिटेड, गतिक सिंथेटिक्स आदी आस्थापनांविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित प्रकरणांची सुनावणी सुरू असल्याची माहिती आहे. या कारवाईचे स्वागत करतानाच पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे की, कारवाई काही कंपन्यांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण पाताळगंगा नदीकाठाची तपासणी होणे गरजेचे आहे. पाताळगंगा नदीकाठच्या खोपोली परिसरातील औद्योगिक आस्थापनांमधून रसायनी पाताळगंगा परिसरात रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे साजगावपासून पाताळगंगा नदीकाठावरील संपूर्ण पट्ट्यातील उद्योगांची स्वतंत्र तपासणी करावी. नदीत कोणत्या ठिकाणी सांडपाणी मिसळते, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याचा नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर काय परिणाम होत आहे, याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे.







