स्थानिक तरुणांचे धाडसी बचाव कार्य
। बोर्ली पंचतन । मकरंद जाधव ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याची घटना शनिवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, होमगार्ड आणि स्थानिक कोळी बांधवांनी वेळीच धाव घेत जेट स्कीच्या सहाय्याने केलेल्या धाडसी बचावकार्यात तिघांचेही प्राण वाचले.
पुण्याहून दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेले आदित्य भिसे, अभिषेक साळवे, भूमी बोऱ्हाडे, शबिल शेख, अभिषेक जॉर्ज आणि तन्वी जगताप हे गणपती विसर्जन पॉइंटजवळ समुद्रात पोहत होते. त्यावेळी अभिषेक साळवे (23), भूमी बोऱ्हाडे (21) आणि आदित्य संदीप भिसे (24) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले. समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे तिघेही बुडू लागल्याने घटनास्थळी काही काळ धावपळ उडाली.
यावेळी त्यांचा मदतीसाठीचा आवाज ऐकून पोर्ट केबिन, विसर्जन पॉइंट येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे यांनी तातडीने बचावकार्यासाठी आवाहन केले. त्यानंतर दिवेआगर येथील गोविंदा मिरवणुकीतील कोळी बांधव प्रणय चोगले, विघ्नेश चोगले, योगेश चोगले, विष्णुदास चोगले यांच्यासह इतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. जेट स्कीच्या सहाय्याने धाडसी बचावकार्य करत तिघांनाही समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पाण्यात बुडाल्याने तिघांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तिन्ही पर्यटकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच घटनेची माहिती जाणून घेतली.
दिवेआगरसारख्या पर्यटनस्थळी समुद्राचा आनंद घेताना पर्यटकांनी पाण्याची खोली, लाटांचा वेग आणि समुद्राची सद्यस्थिती लक्षात घेऊनच समुद्रात उतरावे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन व सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी केले. वेळीच मदतीला धावून आलेल्या कोळी बांधवांमुळे तीन पर्यटकांचा जीव वाचला. त्यांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेचे पोलिसांनी कौतुक केले आहे. दरम्यान, दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता जीवरक्षकांसह आवश्यक बचाव साधने आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







