| रायगड | प्रतिनिधी |
आगामी गणेशोत्सवासाठी कोकणासह राज्याच्या विविध ठिकाणी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसना पथकरातून पूर्णपणे माफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई-बंगळुरू मार्गावरील वाहनांनाही टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली असून, गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा यासाठी शासनाकडून हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
यामध्ये
मुंबई–गोवा महामार्ग
मुंबई–बंगळुर महामार्ग
अटल सेतू
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या संबंधित मार्गांवरही ही सवलत लागू राहील.
वाहनांवर 'गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन' नावाचा पास/स्टिकर लावण्यात येईल.
या पासवर वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद असेल.
गणेशभक्तांना हा पास जवळचे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल.
हाच पास परतीच्या प्रवासासाठीही पूर्णपणे ग्राह्य धरला जाणार आहे.
एसटी बसेसनाही टोलमाफी
कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी म्हणजेच एसटी बसेसनाही या पथकरातून पूर्ण सवलत देण्यात आली आहे. पोलीस आणि आरटीओ यांच्या समन्वयातून एसटी बससाठी विशेष पासची व्यवस्था केली जाणार आहे.
महामार्गांवर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ यांच्यात विशेष समन्वय साधून सर्व उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत.





