| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या सेवा रस्त्यावर चालण्यासाठी गेलेल्या 32 वर्षीय महिला वकिलाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रिया गोस्वामी (32) रा. द्वारका शिवम सोसायटी, सेक्टर 2 ए, करंजाडे असे मृत महिलेचे नाव आहे. प्रिया या वकिलीची प्रॅक्टिस करत होत्या. त्या नेहमीप्रमाणे चालण्यासाठी आपल्या मोटारीने विमानतळालगतच्या सेवा रस्त्यावर आल्या होत्या. त्यांनी रस्त्यालगत मोटार उभी केली आणि वाघीवलीकडून चिंचपाड्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर चालत होत्या. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने प्रियाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर इतर वाहनचालकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी महिलेला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे विमानतळालगतच्या सेवा रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विमानतळ परिसरातील रस्ते रुंद असले, तरी काही ठिकाणी प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून अपघातास कारणीभूत वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे.







