| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील पळस्पे-जेएनपीटी महामार्गावरील नांदगाव येथे डंपरचालकाला चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून डंपरमधील 310 लिटर डिझेल लुटल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 160 लिटर डिझेल, सुमारे सात लाख रुपये किमतीची हुंदाई व्हर्ना कार, लोखंडी रॉड आणि प्लास्टिक पाईप असा मुद्देमाल जप्त केला आहे.
डंपरचालकाने नांदगाव येथे डंपर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. तो लघुशंकेसाठी गेला असता लाल रंगाच्या व्हर्ना कारमधून तसेच राखाडी रंगाच्या आय-10 कारमधून आलेल्या चार जणांनी त्याला चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवला. त्यानंतर डंपरमधील 310 लिटर डिझेल, सुमारे 30 हजार 380 रुपये किमतीचे, घेऊन आरोपी पसार झाल्याने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस हवालदार तुषार बोरसे, पोलीस नाईक सम्राट डाकी, अनिल चव्हाण, पोलीस शिपाई दत्ता जाधव, विशाल दुधे आणि सचिन कोर आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे राजकुमार जयनारायण माझी (23), आशिक तय्यब अन्सारी (22) याला अटक केली. व त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीची लाल रंगाची हुंदाई व्हर्ना कार जप्त केली. तसेच 160 लिटर डिझेल, सुमारे 17 हजार 680 रुपये किमतीचे, लोखंडी रॉड आणि हिरव्या रंगाचा 78 इंच लांबीचा प्लास्टिक पाईप जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 7 लाख 17 हजार 680 रुपये आहे. या गुन्ह्यातील शाहीद, रा. गोवंडी, मुंबई आणि फरहाण या अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे. लुटलेले उर्वरित 170 लिटर डिझेल, गुन्ह्यात वापरलेली राखाडी रंगाची आय-10 कार तसेच अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.







