रायगडात 13,597 गणेशमूर्तींचे विसर्जन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…” अशी आर्त विनवणी करीत दहा दिवसांच्या गणरायाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या गावाला परतले. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात घरगुती तसेच सार्वजनिक 13,597 गणेशमूर्तींचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, भजन, आरती आणि गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला.
दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा करण्यात आली. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या वतीने बाल्या नृत्यासह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य शिबिरेदेखील घेण्यात आली. अलिबागमधील घरत आळी येथील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. संत तुकाराम महाराज यांनी केलेले समाजप्रबोधन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थाविरोधात उचललेली मोहीम याची माहिती चलचित्राद्वारे देऊन जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये भजन, कीर्तनांसह वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.
सायंकाळी पाचनंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही ठिकाणी लेझीम, भजन, तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन, तर काही ठिकाणी मूर्ती टेम्पो व गाडीतून विसर्जनस्थळी नेण्यात आली. विसर्जन घाटावर भाविकांनी अलोट गर्दी केली. आरती, पूजन झाल्यानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील 13 हजार 597 गणेशमूर्तींचे समुद्र, खाडी, तलाव व नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि ओठांवर एकच आर्त साकडे होते; ते म्हणजे, “बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या…”
मिरवणुकीचा सोहळा आनंदात साजरा व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली होती. जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात होता. यामध्ये होमगार्ड जवानांचाही सहभाग होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी योग्य नियोजन केले. दरम्यान, डीजेच्या जोरदार आवाजावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.







