फिफा विश्वचषकात खेळलेल्या संघाला रोखले; ऑस्ट्रेलियातून आलेल्या खेळाडूचा भारतासाठी गोल
| बंगळूरू | वृत्तसंस्था |
भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे वेळापत्रक सध्या अत्यंत व्यस्त आहे. शुक्रवारी (दि.25) बंगळुरूच्या श्री कांतिरवा स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात भारताने बलाढ्य पनामाला 1-1 असे बरोबरीत रोखले. भारतासाठी हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जागतिक क्रमवारीत भारत 138 व्या स्थानावर आणि पनामा 44 व्या स्थानावर आहे.
या संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी जिद्द आणि आक्रमकता दाखवत अप्रतिम कामगिरी केली. सामन्याच्या सुरूवातीपासूनच पनामाने वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय डिफेंडर्सनी त्यांच अनेक हल्ले परतवून लावले. या सामन्यात पहिला गोल करून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. रायन विल्यम्सने 41 व्या मिनिटाला पनामाच्या बचावफळीला चकमा देत हा गोल केला. भारताने ही ऐतिहासिक आघाडी पहिल्या हाफच्या शेवटपर्यंत टिकवून ठेवली. या सामन्यातील रायनचा गोल विशेष होता, कारण याआधी तो ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे. त्याची आई भारतीय असून तो 2026 हंगामापासून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तसेच, या सामन्याला भारताचा माजी कर्णधार आणि स्टार सुनील छेत्रीनेही हजेरी लावली होती.
दुसऱ्या हाफची सुरूवात झाली असता, पाहुण्या संघाने हल्ल्याची तीव्रता वाढवली. त्यांनी सतत गोल करण्याचे प्रयत्न करत भारतीय संघावरील दबाव वाढवला. अखेर त्यांना 68 व्या मिनिटाला यश आले. ओमर व्हॅलेन्सियाने भारताचा गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूला चकमा देत गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. दोन्ही संघांनी नंतर पुन्हा आघाडी घेण्याचे प्रयत्न केले, मात्र सामना बरोबरीत संपला.
पनामा लोकसंख्येने छोटा देश असला, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते 2018 आणि 2026 च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. 2026 च्या फिफा विश्वचषकात त्यांचा सामना इंग्लंड, क्रोएशिया आणि घानाशी झाला होता. तसेच ते 2024-25 च्या कॉनककॅफ नेशन्स लीगचे उपविजेते होते. आता पनामाचा सामना केल्यानंतर भारत कोलकाता येथे पाच वेळेचा विश्वविजेता ब्राझीलशी दोन हात करणार आहे. हा सामना 3 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी दोन वेळेचा विश्वविजेता उरुग्वेशी होणार आहे.







