आकर्षक ड्रेसची खरेदी जोरात
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पनवेल परिसरात गरब्याचे वेध लागले आहेत. विविध गरबा आणि दांडिया कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला असून, तरुणाईमध्ये पारंपरिक पेहरावाची उत्सुकता वाढली आहे.
गरब्यासाठी विशेषतः घागरा-चोळी, रंगीबेरंगी चनिया चोळी, दुपट्टे तसेच आकर्षक ड्रेस बाजारात दाखल झाले आहेत. यंदा पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा मिलाफ असलेल्या पोशाखांना तरुणींची पसंती मिळत आहे. विविध रंग, नक्षीकाम, आरसे आणि आकर्षक भरतकाम असलेल्या घागरा-चोळीच्या ड्रेसची दुकानदारांकडे चौकशी वाढली आहे. पनवेल, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघर परिसरातील बाजारपेठांमध्ये नवरात्रीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. गरबा कार्यक्रमांसाठी विशेष ड्रेससोबतच पारंपरिक दागिने, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, बांगड्या आणि गरबा ॲक्सेसरीजचीही मागणी वाढली आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगांचे पोशाख निवडण्याकडेही तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वीच पनवेलच्या बाजारपेठांमध्ये ‘वेध गरब्याचे, उत्साह नवरात्रीचा’ असे चित्र पाहायला मिळत आहे.





