आझाद मैदान घोषणांनी दणाणले; ‘एसआयआर रद्द करा’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ची जोरदार मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘हुकूमशाही नहीं चलेगी’, ‘एसआयआर रद्द करा’, ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ अशा जोरदार घोषणांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदान दणाणून गेले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.) यांच्यासह विविध डावे, पुरोगामी पक्ष, संस्था-संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला विरोध, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ नयेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी विविध मागण्यांचे फलक झळकवत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार घोषणाबाजी केली.
‘ज्ञानेश कुमार चले जाव’, ‘आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में’ यांसह विविध घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आंदोलकांनी गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. तसेच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शेकापचे राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे, शेकाप नेत्या तेजस्वी घरत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. मिलिंद रानडे, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शैलेंद्र कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मा.ले.चे डॉ. विजय कुलकर्णी यांच्यासह विविध डावे व पुरोगामी विचारांच्या पक्षांचे कार्यकर्ते, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला तसेच दि. 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या आंदोलनालाही यावेळी पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील 2023चा कायदा रद्द करावा, तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
एसआयआर प्रक्रियेलाच विरोध
एसआयआर प्रक्रियेदरम्यान अन्याय्य पद्धतीने मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व पात्र आणि खऱ्या मतदारांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. पात्र मतदारांचे नाव कोणत्याही कारणाने वगळले जाऊ नये आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवत सध्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
फलक, घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनस्थळी ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’, ‘एसआयआर प्रक्रिया बंद करा’ अशा घोषणा आणि फलक झळकत होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पोस्टरही यावेळी प्रदर्शित करण्यात आले. मतदार यादीतील पारदर्शकता आणि पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत भाग असल्याचे सांगत आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.








