| सुतारवाडी | प्रतिनिधी |
भिरा फाटा ते विळा भागाड या 18 किलोमीटर अंतरावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविले जातील, अशी आशा अनेक गणेशभक्तांना होती. मात्र, सार्वजनिक गणपती विसर्जन झाले तरीसुद्धा खड्ड्यांच्या वेदना अनेकांना जाणवत आहेत. गणेशोत्सवानंतर हेटवणे तसेच काही ठिकाणच्या रस्त्याच्या कडेला बारीक खडीचे ढीग करून ठेवलेले होते. मात्र, हे ढीग वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पसरले आहेत. त्यामुळे अनेक दुचाकी वाहन व रिक्षा यांना मोठ्या मुश्किलेने मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये पथदिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे दुचाकी वाहनांना रस्त्यावरील खडी न दिसल्यामुळे अनेक वेळा दुचाकी वाहन घसरण्याचे प्रकार घडलेले आहेत. पुढील महिन्यात दिवाळी सण येत आहे. किमान दिवाळी सणापूर्वी तरी संबंधित खात्याने खड्डे भरून जनतेला प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.







