मुरूड-एकदरा येथील मच्छिमारांची लगबग
| आगरदांडा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाचा उत्साह ओसरताच मुरूड-एकदरा परिसरातील कोळी मच्छिमार बांधव पुन्हा समुद्राकडे रवाना झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मासेमारीला विश्रांती दिल्यानंतर पारंपरिक पद्धतीने बोटी समुद्रात उतरवत मच्छीमारांनी नव्या हंगामाला सुरुवात केली आहे.
मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी अनेक मच्छिमारांनी नौकांची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती तसेच आवश्यक साहित्याची तयारी पूर्ण केली. गणेशोत्सवानंतर समुद्रात मासळीचा चांगला वावर मिळेल आणि यंदाचा हंगाम समाधानकारक जाईल, अशी अपेक्षा मच्छिमार बांधवांकडून व्यक्त होत आहे. मासेमारी पुन्हा सुरू झाल्याने किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मासेमारीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने आगामी हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






