| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय बदल झाला आहे. राजस्थान कॅडरचे 2010 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उपनिवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार, राजपुरोहित एप्रिल 2030 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. गेल्या ऑगस्टपासून हे पद रिक्त होते. मे 2026 पासून ते संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते. यापूर्वी उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार यांना मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या मूळ संवर्गात परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, 24 जून 2025 रोजी देशभरात एसआयआर प्रक्रिया राबवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या महत्त्वाच्या आदेशावर संजय कुमार यांची स्वाक्षरी होती.





