| अलिबाग | प्रतिनिधी |
ऐतिहासिक वारशाचे वारसदार असलेल्या रघुजीराजे आंग्रे यांची सदिच्छा भेट रायगड डाक विभाग अधीक्षक राजेश रनाळकर यांनी घेतली आणि इतिहास, परंपरा व भारतीय डाक विभाग यांचा एक हृदयस्पर्शी संवाद घडून आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक वैभवाची समृद्ध परंपरा लाभली आहे. ज्या भूमीने स्वराज्याच्या शौर्याचा इतिहास अनुभवला, त्याच भूमीला सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पराक्रमाची आणि सागरी वर्चस्वाचीही गौरवशाली किनार लाभली आहे. अलिबाग परिसरातील आंग्रे घराण्याचा ऐतिहासिक वारसा म्हणजे फक्त केवळ एका राजघराण्याची ओळख नसून, तो स्वाभिमान, शौर्य, निष्ठा आणि मराठी सामर्थ्याचे
प्रतीक आहे. या सदिच्छा भेटीदरम्यान जिल्हा डाक अधीक्षक राजेश रनाळकर यांनी भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, राष्ट्रीय वारसा आणि महत्त्वपूर्ण घटनांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फर्स्ट डे कव्हर, फिलाटेली स्टॅम्प आणि विशेष टपाल आवरण (स्पेशल कव्हर) यांविषयी सविस्तर माहिती दिली.







