| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ मधील खांडस येथे महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने दारूच्या नशेत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता ऐनकर असे मारहाण केलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांडस येथील एकनाथ ऐनकर आणि पत्नी ललिता ऐनकर यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती. त्यामुळे याबाबत नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कळंब आऊट पोस्ट पोलीस ठाणे हद्दीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, त्या जोडप्याने पोलीस ठाण्यात आपला कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटवला. त्यानंतर देखील वारंवार चारित्र्यावरून शिवीगाल करून मारहाण केल्याच्या घटना घडल्या. त्यातच सोमवारी (दि.5) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ललिता आपल्या घरामध्ये झोपली असता पती एकनाथ ऐनकर यांनी दरवाजा वाजवला असता झोपेतून उठून उघडण्यास वेळ झाला म्हणून विचारणा करण्यात आली. मात्र, आपल्या पत्नीला काहीही न विचारता संबंधित महिलेच्या चारित्र्यावरून संशय घेत शिविगाळ करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत झाली असून, 54 टाके पडले आहेत. तसेच, उजव्या पायावरती लाकडी दांडक्याने मारल्यामुळे फ्रॅक्चर झाले आहे. या अमानुष मारहाणीची तक्रार त्या विवाहित महिलेचे भाऊ नितेश भगवान कराळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात केली आहे.







