| चिरनेर | प्रतिनिधी |
सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी उरण-नेरुळ/बेलापूर रेल्वे मार्गावरील न्हावा- शेवा रेल्वे स्टेशनवर पूर्व बाजूला तिकीट खिडकी उपलब्ध नसल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानकाच्या पूर्व परिसरातील नागरिकांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्टेशनच्या लांब पल्ल्यावरून पश्चिम बाजूला जावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेरुळ-उरण मार्गावरील लोकल सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या प्रवासात मोठी सुलभता आली आहे; परंतु नियोजनातील त्रुटींमुळे प्रवाशांच्या समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. न्हावा-शेवा रेल्वे स्थानकाला पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूंना परिसर जोडला गेला आहे. मात्र, तिकीट खिडकी केवळ पश्चिम बाजूलाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिणामी, पूर्व भागातून येणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट किंवा पास काढण्यासाठी किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी रेल्वे पादचारी पुलावरून लांबच लांब वळसा घालून पश्चिम बाजूला जावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वेळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा घाईगडबडीत लोकल पकडताना प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी मोठा वेळखाऊ फेरा मारावा लागतो. यामुळे अनेकांच्या लोकल चुकतात, तर काही जण नाईलाजाने विनातिकीट प्रवास करण्यास प्रवृत्त होतात, ज्यामुळे पुढे दंडात्मक कारवाईची भीतीही त्यांच्यावर असते. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला या लांब अंतराच्या चालण्यामुळे मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही या समकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने आणि सिडकोने याची तातडीने दखल घेऊन न्हावा-शेवा स्टेशनच्या पूर्व बाजूला तात्काळ तिकीट खिडकी किंवा स्वयंचलित तिकीट यंत्र बसवावे, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
न्हावा- शेवा स्टेशनच्या पूर्व बाजूला रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर आहेत. येथून शेकडो प्रवासी रोज मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्यामुळे आम्हाला साधे तिकीट काढण्यासाठी स्टेशनला पूर्ण वळसा घालून पश्चिम बाजूला जावे लागते. प्रशासनाने तातडीने पूर्व बाजूला तिकीट खिडकी किंवा ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन सुरू करावी.
विकास पाटील,
स्थानिक प्रवासी
सकाळच्या वेळी ऑफिसला जाताना वेळेची खूप घाई असते. पूर्व बाजूने स्टेशनवर आल्यावर लक्षात येते की तिकीट काढायला पुन्हा पश्चिम बाजूला जावे लागेल, तेव्हा धावपळ उडते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची ही साधी पण महत्त्वाची अडचण लवकरात लवकर सोडवावी.
प्रियांका म्हात्रे,
चाकरमानी प्रवासी







