ऐरोलीत 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त
| कळंबोली | प्रतिनिधी |
गोवा राज्यातनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाला यश आले आहे. ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे मार्गावर सापळा रचून ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत मद्याचे एक हजार बॉक्स, त्यातील 48 हजार बाटल्या आणि ट्रक असा एकूण 1 कोटी 30 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धुळे येथील जावेदखान नवाबखान पिंजारी (24) याला अटक करण्यात आली आहे.
बेलापूर-ठाणे मार्गावरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर सापळा रचला. यावेळी चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा बाराचाकी ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
ट्रकचालकाने वाहनामध्ये साबणाचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, पथकाने ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. या बॉक्सची तपासणी केली असता त्यात गोवा राज्यातनिर्मित ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्या आढळल्या. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या या मद्याच्या बाटल्यांवर बॅच क्रमांक आणि कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) नमूद नसल्याचेही तपासात निदर्शनास आले.
पथकाने एकूण एक हजार बॉक्समधील 48 हजार मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. मद्याच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला बाराचाकी ट्रकही जप्त करण्यात आला. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत एक कोटी 30 लाख 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जावेदखान नवाबखान पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.







