। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा परिसरात राहणाऱ्या तरुणीचे लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अमित रामप्रवेश राय (32) याच्याविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दुसऱ्या तरुणीशी विवाह केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2022 मध्ये पुणे येथे आरोपीची पीडित तरुणीशी मैत्री झाली. त्यानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आश्वासन देत जुलै 2022 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने लग्नाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला. दरम्यान, मे 2026 मध्ये त्याने मध्य प्रदेशातील प्राची पाठक या तरुणीशी विवाह केला. ही बाब समजल्यानंतर तळोजा परिसरातील पीडित तरुणीने तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.







