| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बदलत्या हवामानामुळे फळ पिकांवर मोठा परिणाम होतो. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी विमा कवच मिळणार आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंमलात केली जाणार आहे. आंबा, काजू, सुपारी, नारळ उत्पादकांना याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय कृषी विमा इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकांबरोबरच फळ पिकांची लागवड करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. आंबा, काजूसह नारळ, व सुपारीचे उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. भात पीकाला पर्यायी व्यवसाय म्हणून फळपिक लागवडीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र 12 हजार 952 हेक्टर इतके असून, काजूचे क्षेत्र 2 हजार 396 हेक्टर, नारळाचे क्षेत्र 863.20 हेक्टर आणि सुपारीचे क्षेत्र 1 हजार 248 हेक्टर इतके आहे. जिल्ह्यामध्ये फळ पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण वर्गांसह मध्यम वर्गातील शेतकरी फळ पीक लागवड करीत असतात. कृषी विभागाकडून त्यांना मार्गदर्शन केले जाते. मात्र, बदलत्या हवामानामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती कायमच असते. अवकाळी पाऊ, जास्त तापमान अशा अनेक बदलत्या वातावरणामुळे फळ पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.
शेतकऱ्यांनी आपल्या फळपीकासाठी नोंदणी करून निश्चित मुदतीत विमा हप्ता भरावा. या योजनेत नैसर्गिक घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी संरक्षण मिळणार आहे. काजू फळपीकासाठी 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अवकाळी पाऊस, कमी तापमान आणि गारपीट यांसाठी विमा लागू राहील. या विम्याचा हप्ता दर प्रती हेक्टरी 4 हजार 800 रुपये निश्चित करण्यात आला असून, विमा संरक्षण 1 लाख 20 हजार रुपये इतके आहे. आंबा फळपीकासाठी 1 डिसेंबर ते 31 मार्च तसेच 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, वाऱ्याचा वेग आणि गारपीट या नैसर्गिक संकटांपासून विमा संरक्षण मिळणार आहे. या विम्याचा हप्ता दर प्रती हेक्टरी आता 8 हजार 500 रुपये करण्यात आला आहे. 1 लाख 70 हजार रुपये विमा संरक्षण आहे. नारळ पिकासाठी प्रति हेक्टरी विमा हप्ता 6 हजार 800 रुपये असून, विमा संरक्षीत रक्कम 1 लाख 70 रुपये असणार आहे. वेगाने वारा, जास्त तापमान, पाऊस, कमी पाऊस 1 नोव्हेंबर ते 31 मे पर्यंत कोसळल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे. सुपारीसाठी 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. त्यासाठी प्रति हेक्टरी 4 हजार विमा हप्ता असणार आहे. 1 नोव्हेंबर ते 31 मे या कालावधीत वेगाने वारा, जास्त तापमान, जास्त-कमी पाऊस असल्यामुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे.
तसेच, अंबिया बहारासाठी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमा पोर्टल 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहे. आंबा आणि काजू पिकासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत असून, नारळ व सुपारी पिकासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत असणार आहे. आंब्यासाठी 69, काजूसाठी 38, नारळासाठी 11 आणि सुपारीसाठी 11 महसूल मंडळे अधिसुचित करण्यात आली आहेत. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
आंबा उत्पादकांना दिलासा
मागील वर्षी आंबा पीक विम्याचा हप्ता 14 हजार रुपये होता. त्यामुळे फळ पिक विमा योजनेला फारस अल्प प्रतिसाद मिळाला होता. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांसह शेतकऱ्यांनी पाठपुरावा करीत विमा हप्ता कमी करण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत यावर्षी आंबा पिकचा विमा हप्ता 14 हजार 500 रुपयांवरून 8 हजार 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच, विमा संरक्षण कालावधीत पंधरा दिवस अधिक वाढ केली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे बोलण्यात आले आहे.







