50 टक्केहून अधिक उत्पादनात घट
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यात सध्या भात पिकांची फुटवा, वाढ, फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था सुरु झाली आहे. मात्र, पावसाअभावी जमीनीतील ओलावा कमी झाल्याने जमीनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे पिके पिवळे पडू लागली असून, भात पिकांवर निळे भुंगेरे, खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, अशा अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा भात उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये भाताचे सरासरी क्षेत्र 87 हजार 536 हेक्टर इतके आहे. यावर्षी 22 जून पासून पावसाने सुरुवात केली. सप्टेंबर पर्यंत 90 दिवस पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये जूनमध्ये 11, जूलैमध्ये 25, ऑगस्टमध्ये 31 आणि सप्टेंबरमध्ये 23 दिवस पाऊस कोसळला. जिल्ह्यात प्रत्यक्ष 2 हजार 894.7 मी.मी. पाऊस पडला. मात्र, मिळालेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 250 मि. मी. पाऊस कमी पडला आहे. जूलै महिन्यात सरासरी पेक्षा 52.9 टक्के जास्त पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. त्या कालावधीत सलग पावसाचा खंड झाला नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून पावसाचा खंड आढळून आला. जिल्ह्यामध्ये भात पीक बहरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारली. तसेच, तापमानात वाढ होऊन हवामान उष्ण व कोरडे झाले आहे. कित्येक दिवस पाऊस नसल्याने खाचरातील पाण्याच्या अभावामुळे भातांची रोपे पिवळी पडू लागली आहेत. तसेच, वेगवेगळ्या किड रोगांचा प्रादुर्भाव भात पिकांवर झाला आहे. त्यामुळे अलिबागसह श्रीवर्धन, मुरूड, पेण, खालापूर, कर्जत, तळा, उरण, पोलादपूर, पाली, पनवेल, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, तालुक्यांतील भात पिकांच्या उत्पादनात 25 ते 80 टक्केपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामध्ये पोलादपूर, रोहा व तळा तालुक्यामध्ये 80 टक्के, पेण, अलिबाग, माणगांव व पालीमध्ये 40 टक्के, खालापूर, पनवेल, मुरूड, म्हसळा व कर्जतमध्ये 25 टक्के आणि महाडमध्ये 30 टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगडमध्येही दुष्काळ जाहीर करणार
पाण्याअभावी भात पिकांवर मोठे संकट ओढावले आहे. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात चारा तुटवड्यासह भात पिकांच्या उत्पादनातही प्रचंड घट होणार आहे. याबाबत दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यानंतर लवकरच कॅबिनेट बैठकीत रायगड जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.






