| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरमध्ये गुरुवारी एका खासगी शाळेचे छत कोसळले. या घटनेत जवळपास 28 मुलांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना पेशावरच्या अंतर्गत भागातील दीर कॉलनी याठिकाणी घडल्याचं पेशावर कॅपिटल सिटी पोलीस प्रमुख मिया सईद यांनी सांगितलं. तसंच या घटनेप्रकरणी शाळेच्या मालकाला अटक करण्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मुहम्मद आसिम यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा मुलींसह 28 विद्यार्थी आणि एक शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तसंच, 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचबरोबर, घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आल्याचंही आसिम यांनी सांगितलं. घटनास्थळी बचाव पथकं दाखल झाली असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. कोसळलेल्या इमारतीखाली आणखी काही अडकलेल्या मुलांचा आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे.







