पथदिव्यांच्या अभावामुळे रात्री प्रवास धोकादायक; नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी
| पोयनाड | प्रतिनिधी |
अलिबागला जोडणाऱ्या वडखळ-अलिबाग राज्य मार्गावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अपघातांचा धोका लक्षात घेता संबंधित विभागांनी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या या राज्य मार्गावर दिवसाबरोबरच रात्रीही वाहनांची वर्दळ वाढत आहे. हा मार्ग अलिबागसह रामराज, नागाव, रेवदंडा आणि पुढे मुरूड तालुक्याला जोडतो. धरमतर पुलापासून शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड, पेझारी, पळी, तिनवीरा, मनुशेठ वाडा आणि कार्लेखिंड ही महत्त्वाची ठिकाणे या मार्गावर आहेत, मात्र अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधारात प्रवास करावा लागतो.
रस्त्यालगत पथदिवे नसणे आणि रिफ्लेक्टरच्या अभावामुळे साईडपट्टी स्पष्टपणे न दिसणे, यामुळे दुचाकीस्वार व सायकलस्वारांना त्रास सहन करावा लागतो. स्थानिकांसह पर्यटकांची वाहने आणि अवजड वाहनांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. पादचाऱ्यांनाही अंधारातून वाट काढावी लागते. लोकवस्ती नसलेल्या भागांत अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा दरोड्याच्या घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्री 11 नंतर पोयनाड ते अलिबाग प्रवास दुचाकीस्वारांसाठी कठीण ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन पथदिवे बसवावेत किंवा आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
धरण, मंदिर परिसरात प्रकाश हवा
तिनवीरा धरण हे अलिबाग तालुक्यातील महत्त्वाचे धरण असून, या परिसरात रात्री अंधार असतो. सुरक्षेच्या दृष्टीने येथे वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कार्लेखिंडीत पात्रुदेवीचे मंदिर असून, या ठिकाणीही पथदिवे बसवावेत किंवा पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







