। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूरातील गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्ण ताकद लावली होती. काहीही झालं तरी गोकुळची सत्ता आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. याच मतमोजणीत आतापर्यंत सतेज पाटील यांच्या पॅनेलचे तब्बल 14 उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत विक्रमी 99.96 टक्के मतदान झाले होते.
या निवडणुकीत महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीत 5416 मतदारांपैकी तब्बल 5414 मतदारांनी मदतान केले होते. सध्या मतमोजणी केली जातेय. पुढच्याच काही तासांत चित्र स्पष्ट होणार आहे. गोकुळ दूध संघावर कोणाची सत्ता हे स्पष्ट होणार आहे. परंतु आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. कारण या ठिकाणी एकूण 25 जागांपैकी 14 जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अन्य 11 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.







