पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार
| रसायनी | प्रतिनिधी |
पाताळगंगा नदीवरील खरसुंडी येथील बंधाऱ्यातून कालव्याद्वारे पौध, माजगाव, आंबिवली आणि वारद या गावांना मिळणारे पाणी गेल्या बारा वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील शेती आणि पशुपालन संकटात सापडले आहे. पाण्याअभावी शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक पडली असून, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर कालवा तातडीने सुरू करण्यासाठी माजगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी कालवा सुरू करण्यासाठी एकजुटीने पाठपुरावा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या कालव्याच्या माध्यमातून पूर्वी परिसरातील भातशेतीला मुबलक पाणी मिळत होते. भातपिकासोबतच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. कालव्यातून सातत्याने पाणी वाहत असल्याने परिसर हिरवागार राहत होता. तसेच जनावरांसाठी मुबलक गवत उपलब्ध होत असल्याने पशुपालकांनाही मोठा आधार मिळत होता. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून कालवा बंद असल्याने शेतीच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, काही ठिकाणी शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता हा प्रश्न ही अधिक गंभीर झाला आहे.
पूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या कालव्याला पाणी सोडले जात असे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आणि शेतीच्या अन्य कामांना मदत होत होती. मात्र, अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच कालव्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कालवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत तसेच ‘आपले सरकार’ या माध्यमातून संबंधित प्रशासनाकडे निवेदने सादर करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. पाटबंधारे विभागाकडून कालवा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी गेल्या बारा वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतीला पाणी, जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी कालव्याची तातडीने दुरुस्ती करून पाणी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी पौध, माजगाव, आंबिवली आणि वारद परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू करते, याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.







