अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेड अलर्ट?
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील 6 महिन्यांपासून कारवाई मोहिम हाती घेतली आहे. यादरम्यान, लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती अभियान देखील सुरु आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, अलिबागमधील तहसील कार्यालयाने एसीबीचा धसका घेतल्याची चर्चा जोर धरत आहे. तसेच, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून रेड अलर्टचा इशारा दिल्याची देखील चर्चा होत आहे.
रायगड जिल्ह्यातील महसूल विभागासह जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती अभियान सुरु केले आहे. रायगडसह नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारडवर काही लाचखोर अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच धसका अलिबागमधील तहसील कार्यालयाने घेतला आहे. मागील महिन्याभरापूर्वी कार्यालयातील एकही अधिकारी कार्यालयात थांबतच नव्हते. मात्र, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा स्वीय सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर महसूल विभागातील काही लाचखोर अधिकारी व कर्मचारी भितीच्या छायेत वावरत असल्याची चर्चा जोर धरत आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातच वेगळ्या कामाच्या नावाखाली बोलावण्यात आल्याची चर्चा तहसील कार्यालयात सुरु होती. तसेच त्यांच्यावर लाचलुचपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात कोण लाचखोर सापडणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.






