दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी अडवण्याचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन राज्यात पाणी अडवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साठवण बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याच्या प्रक्रिया सरकारने पूर्ण केली नाही. कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील बेकरे पूल येथे असलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे पाण्यावर अनेक नळपाणी योजना असताना देखील तेथील सिमेंट बंधाऱ्याला झडपा लावण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून सरकारचे हेच का पाणी अडवण्याचे धोरण अशी टीका केली आहे.
महाराष्ट्रातील 314 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याने मृद व जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करावी असे आदेश आहेत. राज्यात सन 2026 च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-1’ आणि ‘ट्रिगर-2’ अंतर्गत दुष्काळ लक्षात घेऊन पाण्याचे दुर्भिक्ष व संभाव्य अल-निनो परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. पाणी अडवणे दृष्टीने सर्व बंधाऱ्यांवर गेट किंवा फळ्या बसवून पाणी अडवले जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), जिल्हा नियोजन निधी, तसेच खासदार आणि आमदार निधीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे असा सरकारला आशावाद आहे.
त्यानुसार कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधले जात आहेत. मात्र, कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नद्यांमध्ये नाल्यावर बांधलेले सिमेंट बंधारे यात अनेक ठिकाणी पाणी अडवण्याचा कार्यवाही सरकारने केलेली नाही. कर्जत -कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमधील बेकरे पूल येथे आठ नळपाणी योजना अवलंबून असलेल्या सिमेंट बंधाऱ्याला अद्याप झडपा लावण्यात आलेल्या नाहीत. पाली -भूतिवली धरणांमधून वाहून येणारे पाणी अडवण्यासाठी आणि उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी येथे जिल्हा परिषदकडून सिमेंट बंधारा बांधला आहे. मात्र, त्या बंधाऱ्याला दुष्काळाच्या झळा बसत असून, देखील लोखंडी प्लेट लावून पाणी अडवण्याची आठवण कर्जत तालुक्याला प्रशासनाला नाही. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, तालुक्यात दुष्काळ स्थिती असताना केवळ कागदावरच पाणी अडवण्याची मोहीम हाती घेतली आहे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.







