नाचणी, कडधान्य पिके धोक्यात
| पाली | प्रतिनिधी |
मागील वर्षी परतीच्या लांबलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, यावर्षी चित्र पूर्णपणे उलट असून, पाऊस अपुरा पडल्याने आणि तो वेळेआधीच निघून गेल्याने जिल्ह्यावरील शेतीचे संकट कायम आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने रायगडमधील शेतकऱ्यांचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या हक्काच्या नाचणी, वरी आणि कडधान्य या नगदी पिकांवर मोठे संकट ओढावले आहे.
रब्बी हंगामाची सुरुवात साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होते आणि मार्च-एप्रिलपर्यंत तो चालतो. जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण बारा ते साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. भातशेतीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी कडधान्याची लागवड करतात, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिकांना पूरक वातावरण मिळालेले नाही. शेत व डोंगर उतारावरील जमिनी कोरड्या व कडक पडल्यामुळे तसेच ओलाव्याचा अभाव असल्यामुळे वरी व नाचणीची मशागत करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. परिणामी, कडधान्य लागवडीसाठी शेतात पुरेसा ओलावा नसल्याने यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगड हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथील बांधव डोंगर उतारावर आणि माळरान किंवा वरकस जमिनीवर नाचणी व वरीची शेती करतात.
अनेक शेतकऱ्यांकडे हक्काची सपाट जमीन नसली तरी ते डोंगराळ भागावर जीवापाड मेहनत करून हे पीक घेतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा घरखर्च चालतो आणि खायला धान्यही मिळते. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे नियोजन कोलमडले असून, या संकटाशी सामना कसा करावा, असा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा ठाकला आहे. मागील वर्षी पाऊस लांबल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते, तर चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने आणि तो लवकर गेल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतीचे शास्त्र असते, त्यानुसार प्रत्येक हंगाम सांभाळावा लागतो. वेळेवर पाऊस न पडल्याने जमिनीची योग्य मशागत करता आली नाही आणि कडधान्य पिकाचा हंगाम हातातून निघून चालला आहे. या लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.







