तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीमध्ये येथील कामगारांनीच कॉपर केबल चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, सुरक्षा रक्षकांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. परंतु, ही घटना घडून अनेक तास उलटून गेले, तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर या ठिकाणी भारताचा पहिला प्रोपेन डिहायड्रोजनेशन आणि पॉलिप्रॉपिलीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. औद्योगिक विकासाला गती देणारा हा प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरु असून, या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे 2027 पर्यंत हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य कंपनीत आणण्यात आले आहे. मात्र, कंपनीत काम करणाऱ्या काही कामगारांकडूनच कंपनीतील साहित्य चोरीच्या चर्चा सुरु आहेत. गेल कंपनीत शुक्रवारी (दि.30) रात्री कॉपर केबल चोरण्याचा प्रयत्न तेथील कामगारांनीच केल्याची बाब सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिघांना ताब्यात घेऊन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणले. त्यानंतर रेवदंडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. रेवदंडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन रात्री पोलीस ठाण्यात नेले. मात्र, काही तासांत त्यांना सोडण्यात आले. ही घटना घडून कित्येक तास उलटून गेले. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशीसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सांगितले. याबाबत कंपनी प्रशासनाला विचारणाना केल्यावर त्यांनी ही बाब पोलिसांच्याकडील असल्याने त्यावर काहीही बोलू शकत नाही. मात्र, चोरी झाल्याची माहिती समजते, असे त्यांनी सांगितले.







