। दिल्ली । प्रतिनिधी |
रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महामोर्चासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत भाई पाटील दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर जयंत पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे नेते महामोर्चाच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येत आहे. मिंटो रोड येथून सुरू होणारी रॅली रामलीला मैदानाकडे मार्गस्थ होणार असून, तेथे विरोधकांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या महामोर्चात इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामलीला मैदान परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, जवळपास १० हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. या महामोर्चासाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.






