| माणगाव | प्रतिनिधी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे आयबीएमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय आयबीएम क्विस्किट फॉल फेस्ट उत्साहात संपन्न झाला. 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या रहोत्सवातून क्वांटम तंत्रज्ञानाच्या नव्या क्षितिजांचा वेध घेण्यात आला.
विविध शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्रातील एकूण 170 निवडक विद्यार्थी व प्राध्यापकांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील आठ तज्ज्ञ वक्त्यांनी क्वांटम संगणनातील अद्ययावत घडामोडी, संशोधनाच्या दिशा, औद्योगिक उपयोग आणि भविष्यातील रोजगार व करिअरच्या संधी यांवर मार्गदर्शन केले. क्वांटम संगणनाची मूलभूत तत्त्वे, क्वांटम अल्गोरिदम, क्वांटम तंत्रज्ञानाचे औद्योगिक क्षेत्रातील उपयोग आणि क्वांटम एरर करेक्शन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर या महोत्सवात सविस्तर चर्चा झाली. केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना आयबीएमच्या क्विस्किट फ्रेमवर्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तज्ज्ञांची व्याख्याने, संवादात्मक सत्रे आणि प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना क्वांटम संगणनाच्या गुंतागुंतीच्या संकल्पना समजून घेण्यास मदत झाली. या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले ते हॅकाथॉन आणि पोस्टर सादरीकरणासारखे तांत्रिक उपक्रम. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत समस्या सोडविण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाभिमुख विचार विकसित करण्याचा प्रयत्न केला.
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने क्वांटम तंत्रज्ञानाचा उद्योग, संशोधन आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो, याचीही विद्यार्थ्यांना जाणीव झाली. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात मुख्य आयोजक प्रा. अरविंद डब्ल्यू. किवेळेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सहआयोजक डॉ. लक्ष्मण नेटक आणि डॉ. हर्षा गायकवाड यांनीही आयोजनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांना प्रोत्साहन देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक बांधिलकीचे दर्शन घडविले. क्वांटम तंत्रज्ञानाच्या नव्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका निश्चितच मोलाची ठरणार आहे.







