प्रलंबित मागण्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा
| पनवेल | प्रतिनिधी |
रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध समस्या आणि वाढत्या महागाईच्या प्रश्नावर रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन, पनवेलने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यासह सर्वसामान्य जनतेला महागाईतून दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली (दि.31) खांदा कॉलनी, सेक्टर 9 येथील शिवसेना शाखेत ही बैठक पार पडली. यावेळी पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणी, प्रलंबित मागण्या आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
रास्त भाव धान्य दुकानदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठोस भूमिका मांडण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. दुकानदारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी भूमिका भरत पाटील यांनी मांडली. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईवर नियंत्रण आणून जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. बैठकीत संघटनेच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. संघटनेच्या कार्यात वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी व दुकानदारांच्या असहकार्याबाबत चर्चा करून सर्वांनी संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. दुकानदारांच्या हक्कांचे प्रश्न असोत किंवा महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, या दोन्ही विषयांवर संघटना सातत्याने पाठपुरावा करणार आहे. प्रशासनाने समस्यांची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.







