चायनीज पणत्यांकडे वाढता कल; कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
दिवाळीच्या सणात प्रत्येक घराला प्रकाशमान करणारी लाल मातीची पणती आता स्वतःच अस्तित्वाची लढाई लढत आहे. पिढ्यानपिढ्या कुंभार समाजाच्या हातातून आकाराला येणाऱ्या या पारंपरिक पणत्यांची जागा बाजारपेठेत आयत्या चायनीज बनावटीच्या पणत्यांनी घेतल्याने श्रीवर्धनमधील कुंभार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
श्रीवर्धन येथील कुंभारवाड्यातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह लाल मातीच्या पणत्या तयार करण्यावर अवलंबून होता. मात्र, बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या चायनीज पणत्यांमुळे हाताने बनविलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी घटत चालली आहे. परिणामी, या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी होत असून, तरुण पिढीही पारंपरिक व्यवसायापासून दूर जात आहे.एकेकाळी घराघरांत चालणारी ही कला भविष्यात केवळ आठवण बनण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, तांबडीच्या डोंगरातील एक भाग पूर्वी कुंभार व्यावसायिकांसाठी राखीव होता. या ठिकाणाला कुंभार खाण म्हणून ओळखले जात असे. येथील लाल मातीचा वापर पणत्या तयार करण्यासाठी केला जात होता. मात्र, सध्या या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने माती आणतानाही कुंभार बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारातील स्पर्धा आणि कच्च्या मालाची अडचण अशा दुहेरी संकटात हा व्यवसाय सापडला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सणासुदीच्या काळात आवर्जून लाल मातीच्या पणत्यांची खरेदी करून या कारागिरांच्या कलेला हातभार लावण्याची गरज आहे. कारण, ही केवळ पणतीची खरेदी नसून, एका पारंपरिक व्यवसायाच्या अस्तित्वाला दिलेला आधार आहे.
पूर्वी दिवाळीच्या काळात पणत्या बनविण्याचे काम रात्रंदिवस सुरू असायचे. आता बाजारात चायनीज पणत्या सहज मिळत असल्याने आमच्या हाताने बनवलेल्या पणत्यांना अपेक्षित मागणी राहिलेली नाही. या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. ग्राहकांनी दिवाळीत तरी मातीच्या पणत्यांना पसंती दिली, तर आमची ही पारंपरिक कला टिकून राहण्यास मदत होईल.
रवी करंजकर,
व्यवसायीक, श्रीवर्धन







