| कर्जत | प्रतिनिधी |
टोरंट जल विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्ष तोडीस कर्जत प्रेस क्लब आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांनी ही वृक्षतोड तात्काळ थांबविण्याबाबत कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना निवेदन सादर केले आहे. तसेच, हे निवेदन टोरंट कंपनी प्रशासनाला आणि सरकारला पाठवावे, अशी विनंती देखील पत्रकारांतर्फे करण्यात आली आहे.
या निवेदनामध्ये कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिक निसर्गसंपत्तीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रायगड जिल्हा हा समृद्ध वनसंपदा, डोंगररांगा, जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, येथील वृक्षतोड हा केवळ स्थानिक प्रश्न नसून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहे. असे अनेक मुद्दे या निवेदनात नमुद करण्यात आलले आहेत. यावेळी रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, अध्यक्ष गणेश पवार, विजय मांडे, संजय गायकवाड, विद्यानंद ओव्हाळ, संतोष दळवी, जयवंत हाबळे, दीपक पाटील, अजय गायकवाड, मल्हार पवार, मोतीराम पादिर, अनिल गवळे, संजय अभंगे, गणेश पुरवंत, विलास श्रीखंडे, ज्ञानेश्वर बागडे आदी उपस्थित होते.







